मसूर, महाराष्ट्र :- जनसेवा हीच ईश्वरसेवा या उक्तीप्रमाणे आपल्या हातून गोरगरीब, गरजू व्यक्तींची सेवा करण्याची संधी आपणास मिळालेले आहे. हा विचार घेऊन मसूर गावचे माननीय सरपंच श्री पंकज बाळकृष्ण दिक्षीत यांनी मसूर गावातील 250 पेक्षा जास्त, निराधार लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देऊ असे आश्वासन दिले. संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीद्वारे मिळणाऱ्या लाभांबाबत झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात माननीय सरपंच बोलत होते.
ग्रामपंचायत मसूर येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीद्वारे मिळणाऱ्या योजनेच्या लाभांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक ०८/०९/२०२२
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गावातील निराधार, अपंग, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत, अविवाहित महिला यांना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांतून महिना रुपये 1000 मानधन दिले जाते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू लोकांनी घ्यावा या हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीद्वारे एक मार्गदर्शन पर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी या समितीचे अध्यक्ष श्री. डॉ. शंकरराव खापे ( बापू ) यांनी निराधार लोकांसाठी असणाऱ्या सर्व योजना विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य माननीय तानाजी फडतरे, जागृती शिक्षण संस्था, बनवडी सचिव मा. विनायक माळी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती मसूर अध्यक्ष मा. नरेश माने, माजी सरपंच मसूर मा. प्रकाश माळी व मा. दिनकर शिरतोडे, ग्रामपंचायत मसूर सदस्य व माजी सरपंच मा. सुनिता मसुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मा. सिकंदर शेख, लायन्स क्लब ऑफ मसूर अध्यक्ष मा. दिलीप पाटील, ग्रामपंचायत मसूर चे सदस्य मा. कैलास कांबळे, मा. अलका यादव, मा. कौशल्या पाटोळे, मा. पूजा साळुंखे, मा. निलोफर मोमीन, अंगणवाडी सेविका सौ संगीता गुरव आणि इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीद्वारे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. श्री शंकरराव खापे ( बापू ) मार्गदर्शन करताना म्हटले की, जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे आपल्या हातून गोरगरीब, गरजू व्यक्तींची सेवा करण्याची संधी आपणास मिळालेली आहे. ती आपण चांगल्या प्रकारे करत आहात. आपल्या गावातील निराधार अपंग, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत, अविवाहित महिला यांना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या वेगवेगळे योजनांतून महिना १ हजार रुपये मानधन दिले जाते.
आपल्या गावातील अशा स्वरूपाच्या लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती नसते. त्यामुळे मिळणाऱ्या लाभांपासून त्या वंचित राहतात परिणामी त्यांना कष्टातच राहावे लागते. म्हणून अशा लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊया असे आवाहन मा. खापे साहेबांनी ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांना केले.
आपल्या गावातील सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य, व्हाईस चेअरमन, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, बचत गट अध्यक्षा, सी आर पी, समाजसेवक, मंडळींनी भेदभाव न करता त्यांना मदतीचा हात देण्याची व सहकार्य करण्याची आम्हाला अपेक्षा आहे त्याशिवाय पात्र लाभार्थींना लाभ मिळू शकणार नाही. असे मा. खापे साहेब म्हटले.
मसूर गावचे माननीय सरपंच श्री पंकज दीक्षित, उपसरपंच मा. श्री. विजयसिंह जगदाळे आणि इतर सर्व मान्यवर सदस्य यांनी मसूर गावातील निराधार लोकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनाचा आणि इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारे मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले. निराधार लोकांना योजनेची माहिती देणे, कागदपत्रे गोळा करण्यासाठी मदत करणे, अर्ज भरण्यासाठी मदत करणे अशी महत्त्वाची मदतीची कामे निराधार लोकांसाठी ग्रामपंचायत करणार आहे. तसेच या योजनेचे अर्जही ग्रामपंचायतीच्या वतीने निराधार लोकांना दिले जाणार आहेत.
by श्री. गणेश भिसे
संगणक परिचालक ग्रामपंचायत मसूर.